05/07/2026
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचं २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात केलेल्या हल्ल्यात निधन झालं. त्यानंतर, चार महिन्यांनी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहे. त्याकरता देशभरासह अनेक परदेशी नागरिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इराणमध्ये दाखल होत आहेत. असं असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डिवचलं. खामेनीप्रमाणेच इराणमधील इतर सर्व नेते एका झटक्यात संपवू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आता इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे. "लोकांना मारलं जाऊ शकते, पण विचारांना नाही. तुम्ही अयातुल्ला खामेनी यांची हत्या केली, पण वास्तवात तुम्ही एक अत्तराची बाटली फोडली आहे, ज्याचा सुगंध आता सगळीकडे पसरला आहे", असं अर्मेनियाच्या इराणच्या दूतावासानं एक्स पोस्ट केलं आहे. तसंच, "खामेनी यांच्या निधनामुळे आलेला दुःखाचा महापूर कधीही समजणार नाही, कारण अमेरिकेला "ना संस्कृती आहे, ना इतिहास, आणि ना सन्मान", असा उपरोधिक टोलाही लगावला.