05/04/2025
प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी - तक्षशीला ज्ञान केंद्राचा उपक्रम
इस्लामपूर, दि. ५ एप्रिल :
तक्षशीला ज्ञान केंद्र, इस्लामपूरच्या वतीने आज तक्षशीला विहारामध्ये प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून वंदनाने झाली. यानंतर सम्राट अशोक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आयु. संतराम विरभक्त व आयु. मधूकर घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात तक्षशीला ज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष अवधूत कांबळे व प्रा. वसंत भंडारे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. अवधूत कांबळे यांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे अहिंसेवरील निष्ठा, बुद्धधर्माचा स्विकार आणि त्यांच्या धम्मविचारांचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले. “अशोक हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून, ते एक विचारप्रवाह आहेत,” असे ते म्हणाले.
प्रा. वसंत भंडारे यांनी कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक यांच्या जीवनात झालेला परिवर्तनाचा प्रवास, बौद्ध धर्माचा स्वीकार व त्यांनी केलेला समाजप्रबोधनाचा कार्य याचे तपशीलवार वर्णन केले. “धम्माचे विचार आणि नैतिकता यांचा प्रसार करणारे अशोक हे आदर्श शासक होते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद शंकर कांबळे होते. आपल्या भाषणात त्यांनी “खरा पराक्रम म्हणजे अंतर्मनाचा विजय असतो” या विचारावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुरणे यांनी केले. मधूरा कांबळे व मनीषा भोसले यांनी सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हाती घेऊन रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीचे आयोजन अरविंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
कार्यक्रमाचे संयोजन सत्यजीत माने, उमेश सुर्यगंध व संजय बनसोडे यांनी केले. आभारप्रदर्शन ऋत्विज कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सुनिल उरूणकर, डॉ. दिलीप सावंत, मिलिंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.