26/07/2026
'आई बाबा होताना.. साथ आयुर्वेदाची' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न....
'पंचवेद'चे वैद्य सौ वरदा वाचासुंदर आणि वैद्य मिहीर वाचासुंदर यांच्या द्वारा लिखित 'आई बाबा होताना..' या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहामध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाला...
पुण्याच्या महापौर सन्माननीय सौ मंजुषाताई नागपुरे, अनुरूप विवाह संस्थेच्या संचालक व सुप्रसिद्ध विवाह समुपदेशक डॉ सौ गौरी कानिटकर, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सचिव ज्येष्ठ वैद्य राजेंद्र हुपरीकर, कॉक्लिया संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉ अविनाश वाचासुंदर, पुण्यातील ज्येष्ठ स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ संजीव खुर्द, मेनका प्रकाशन संस्थेचे श्री अभय कुलकर्णी अशा मान्यवरांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली...
महापौर सौ मंजुषाताई नागपुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुर्वेद व आपल्या भारतीय संस्कृतीमधील संस्कारांचा ठेवा जतन करण्याचे महत्त्व उस्फूर्तपणे मांडले.. अतिशय भावस्पर्शी असे वैयक्तिक अनुभव सौ नागपुरे मॅम नी आपल्या भाषणात सांगितल्यामुळे सर्वांनाच त्यांचे भाषण अतिशय भावले....
डॉ गौरी कानिटकर यांनी विवाह संस्था, चान्स घेण्यामागील जोडप्याची भूमिका, सध्याची कौटुंबिक परिस्थिती, व्यसनाधिनता अशा विविध विषयांवर आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली...
वैद्य राजेंद्र हुपरीकर सरांनी तसेच डॉ अविनाश वाचासुंदर यांनी पुस्तकाचे विविध पैलू आणि त्यांची आजच्या काळातील उपयोगिता याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्य नचिकेत वाचासुंदर यांनी केले. 'पंचवेद आयुर्वेद' च्या 36 वर्षांच्या प्रवासातील एक अभिमानास्पद क्षण म्हणून या पुस्तक प्रकाशनाचा उल्लेख वैद्य नचिकेत वाचासुंदर यांनी केला...
वैद्य सौ वरदा वाचासुंदर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील लेखकांची भूमिका सर्वांसमोर मांडली...
वैद्य मिहीर वाचासुंदर यांनी होणाऱ्या आई-बाबांचा प्रवास सुखकर करण्यासाठी हे पुस्तक कशाप्रकारे मदत करू शकते याविषयी माहिती दिली...
मेनका प्रकाशन च्या वतीने श्री अभय कुलकर्णी यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका व सध्याच्या काळातील अशा स्वरूपाच्या साहित्याची गरज याविषयी आपले मत मांडले.
सौ शैला वंजारवाडकर यांनी कार्यक्रमाचे औपचारिक आभार प्रदर्शन केले...
श्री ऋषिकेश कासांडे यांच्या सुश्राव्य पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली...
सौ अपर्णाताई डोळे यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले...
शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, मित्र परिवार, नातेवाईक यांच्यासह वाचन प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित होते....