06/12/2025
आयुर्वेद हे संपूर्ण जीवनशास्त्र : डॉ. ऋषिकेश जाधव
__
संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचे स्वागत
__
महागाव (ता. गडहिंग्लज) :
“आयुर्वेद हे केवळ औषधोपचाराचे तंत्र नसून संपूर्ण जीवनशैलीचे विज्ञान आहे. मन–शरीर–आत्मा यांचा समतोल साधण्याची क्षमता आयुर्वेदात अद्वितीय आहे, म्हणूनच दुष्परिणाममुक्त उपचारपद्धती म्हणून जगभर याची मागणी झपाट्याने वाढत आहे,” असे प्रतिपादन स्वर्णायु हेल्थकेअर, कोल्हापूरचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, डॉ. ऋषिकेश जाधव यांनी केले.
संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात झालेल्या नवागत विद्यार्थी स्वागत समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरुंबेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा वेध घेताना त्यांनी सांगितले, “ग्रामीण भागातून येऊन खेळात प्रगती करणे सोपे नव्हते. विरोध, अपयश आणि मर्यादा हे सगळे होते; परंतु जिद्द, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास यांनीच मला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले. समस्या या मार्गातील अडथळे नसून व्यक्तिमत्त्व घडवणारे टप्पे आहेत.”
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. प्राचार्या डॉ. मंगला मोरबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
समारंभास डॉ. गणेश आडेलकर, डॉ. संगीता मनगुळे, डॉ. विकास कटाने, डॉ. संमीधा चौगुले, डॉ. शर्मिली पाटील, डॉ. महेश पाटील, अनिल पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आभारप्रदर्शन डॉ. दिग्विजय पाटील यांनी केले.