22/07/2026
जागतिक मेंदू दिन : निरोगी मेंदूसाठी निरोगी मन
मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भौतिक अवयव आहे. परंतु या मेंदूचा खरा सारथी म्हणजे मन (Mind). आयुर्वेदानुसार मन हे अंतःकरणाचे एक अंग असून त्याचा बुद्धी, स्मृती आणि निर्णयक्षमतेवर थेट प्रभाव असतो. म्हणूनच मन प्रसन्न, शांत आणि स्थिर असेल तर बुद्धी योग्य प्रकारे कार्य करते.
आयुर्वेदात 'प्रज्ञापराध' हे अनेक रोगांचे मूळ कारण मानले आहे. म्हणजेच योग्य काय आणि अयोग्य काय हे माहीत असूनही अयोग्य कृती करणे. सततचा ताण, राग, मत्सर, असंतुलित जीवनशैली आणि नकारात्मक विचार यांमुळे मन अस्थिर होते आणि त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवरही होतो.
मन नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्यासाठी निसर्गाशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. हिरवळ, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडे, पाऊस आणि सूर्यप्रकाश मनाला शांतता देतात. त्यामुळे पर्यावरण जपा, झाडे लावा आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ठेवा. सकारात्मक राहण्यासाठी चांगले मित्र, प्रेमळ नाती आणि आनंदी सहवास हेही मानसिक आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.
मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी प्राणायाम, ध्यान आणि सद्वृत्ताचे पालन हा सर्वोत्तम मार्ग आहे. सत्य, संयम, करुणा, स्वच्छ आचार-विचार आणि नियमित दिनचर्या यांमुळे मन स्थिर राहते व बुद्धी अधिक सक्षम बनते.
निरोगी मेंदूची सुरुवात निरोगी मनापासून होते. मन जपा, निसर्ग जपा आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा स्वीकार करा.
– वैद्य पारितोषिनी कुकडे-पाटील
स्वास्थ्यायन आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
विष्णू नगर, पालघर