18/05/2026
*ऑनलाईन औषध विक्रीविरोधात संताप; २० मे रोजी उलवेतील १५० हून अधिक मेडिकल दुकाने राहणार बंद*
*ई-फार्मसीविरोधातील देशव्यापी आंदोलनाला केमिस्ट असोसिएशन उलवेचा जाहीर पाठिंबा*
उलवे, ता. पनवेल | दिनांक : १३/०५/२०२६
ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या अन्यायकारक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दिनांक २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली असून, या आंदोलनाला केमिस्ट असोसिएशन उलवेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
उलवे परिसरातील सुमारे १५० हून अधिक मेडिकल स्टोअर्स या बंदमध्ये सहभागी होणार असून, सर्व औषध विक्रेत्यांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, औषध व्यवसाय हा औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत नियंत्रित असला तरी ऑनलाईन औषध विक्रीसाठी अद्याप स्पष्ट कायदेशीर चौकट अस्तित्वात नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकली जात असून अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर वाढत आहे. तसेच बनावट औषधांचा धोका देखील वाढल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेने आरोप केला आहे की, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या सवलती देऊन ऑनलाईन औषध विक्रीला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे पारंपरिक लहान औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कोविड काळात घरपोच औषध वितरणासाठी दिलेल्या तात्पुरत्या सवलतींचा काही कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संघटनांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियम लागू करून मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
दरम्यान, बंदमुळे रुग्णांना काही अडचणी येऊ शकतात याची जाणीव असून, त्याबद्दल दिलगीर असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या आंदोलनाला *अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल, सचिव अनिल नावंदर, रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील आणि सचिव प्रविण नावंदर* यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
तसेच केमिस्ट असोसिएशन उलवेच्या अध्यक्षा *सौ. सीमा सुभाष पाटील* यांनी सर्व मेडिकल दुकानदारांनी बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य चे आवाहन केले.