27/05/2026
चमकदार त्वचा आणि निरोगी पोटाचा काय संबंध आहे?
आयुर्वेदाच्या प्राचीन आणि समृद्ध वारशात एका अत्यंत महत्त्वाच्या सूत्राचा उल्लेख आढळतो—"सर्वे रोगाः अपि मंदेऽग्नौ" म्हणजेच शरीरातील बहुतांश आजारांचे मूळ हे आपल्या मंदावलेल्या पचनशक्तीमध्ये (अग्नी) दडलेले असते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनियमित खाणं, जंक फूड, झोपेची कमतरता आणि सततचा मानसिक ताण यामुळे पोटाचे विकार कमालीचे वाढताना दिसत आहेत. चेहरा कितीही सुंदर असला तरी त्यावरची नैसर्गिक चमक हरवली की व्यक्तिमत्त्व थकलेलं आणि निस्तेज दिसू लागतं. अनेकजण महागडी क्रीम्स, फेसवॉश किंवा ब्युटी ट्रीटमेंट्स वापरूनही चेहऱ्यावर पुन्हा तेज येत नाही अशी तक्रार करतात. पण वरवर पाहता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटत असल्या, तरी मानवी शरीररचनेचा विचार केला तर त्यांचा एकमेकांशी अत्यंत थेट आणि गहिरा संबंध आहे. आपली त्वचा हा केवळ शरीराचा बाह्य भाग नसून, ती आपल्या अंतर्गत आरोग्याचा आरसा असते. म्हणूनच जुने लोक अगदी अनुभवाने सांगायचे, “पोट साफ तर चेहरा लख्ख.”जेव्हा आपल्या चुकीच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडते, तेव्हा शरीरात 'आम' म्हणजेच विषारी घटक (Toxins) तयार होऊ लागतात. ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅससारख्या समस्यांमुळे साठलेले हे विषारी घटक रक्ताभिसरणाद्वारे संपूर्ण शरीरात आणि पर्यायाने त्वचेपर्यंत पोहोचतात. याचा परिणाम म्हणून त्वचा कोरडी, फिकी आणि थकलेली दिसते; अनेकदा डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा चेहऱ्यावर छोटे पुरळ येण्यामागेही हाच पचनसंस्थेचा बिघाड कारणीभूत असतो. एका तरुणीची गोष्ट यासाठी अगदी योग्य उदाहरण ठरू शकते. ती सतत चेहऱ्यावरील डलनेस कमी करण्यासाठी नवनवीन प्रॉडक्ट्स वापरत होती. काही दिवस फरक दिसायचा, पण पुन्हा चेहरा पूर्वीसारखाच निस्तेज व्हायचा. अखेर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तिला समजले की तिच्या समस्येचे मूळ शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता आणि पचनाच्या त्रासात आहे. तिने केवळ तिच्या आहाराची पद्धत बदलली आणि वेळेवर झोप घेण्यास सुरुवात केली, तर अवघ्या काही आठवड्यांतच तिच्या चेहऱ्यावर कोणतीही क्रीम न लावता हरवलेली नैसर्गिक चमक परत आली.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी बाह्य उपचारांपेक्षा शरीर आतून निरोगी असणं अधिक महत्त्वाचं आहे. पोटाचे विकार दूर करून चेहऱ्याला पुन्हा टवटवीत बनवण्यासाठी निसर्गाने आपल्या स्वयंपाकघरातच अनेक उत्तम पर्याय दिले आहेत. आपल्या दिनचर्येत (Dinacharya) काही छोटे पण महत्त्वाचे बदल करून आपण हा समतोल साधू शकतो. पोट निरोगी ठेवण्यासाठी आपल्या प्रकृती नुसार आहार असणे आवश्यक आहे; तर दुसरीकडे जास्त तेलकट, मसालेदार आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळायला हवे. जेव्हा पोट पूर्णपणे साफ होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये नैसर्गिकरी्या बाहेर टाकली जातात, तेव्हा रक्ताची ही शुद्धता थेट चेहऱ्यावर प्रतिबिंबित होते. त्वचेची खरी चमक कोणत्याही मेकअपने नाही, तर चांगल्या आरोग्याने येते. म्हणूनच, जर तुमचा चेहरा सतत थकलेला आणि फिका दिसत असेल, तर फक्त क्रीम बदलण्यापेक्षा आपल्या पचनाकडे लक्ष द्यायला हवे, कारण सुंदर त्वचेचा खरा मार्ग पोटातूनच जातो.
तुम्हालाही कधी पोटाच्या त्रासामुळे चेहऱ्यावर असा निस्तेजपणा किंवा डलनेस जाणवला आहे का? यावर तुम्ही कोणता घरगुती उपाय केला, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा!
डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
पुणे