24/08/2026
"अरे, ये Gen Z च्या मुर्दाड पालका"
डॉ दिनेश ललवाणी
राजकीय रणनीतीकार
8432269369
आज Gen Z मध्येही एक वेगळी विभागणी झालेली दिसते. एक Gen Z असा आहे, ज्याला आपल्या आयुष्याचा शोध घ्यायचा आहे. करिअर करायचं आहे, नवनवीन कला शिकायच्या आहेत, आपल्या पॅशनवर काम करायचं आहे, स्पोर्ट्सकडे वळायचं आहे, जिममध्ये घाम गाळायचा आहे, स्वतःवर काम करायचं आहे आणि या आयुष्यात आपण काय योगदान देऊ शकतो, याचा शोध घ्यायचा आहे. माणूस म्हणून आपल्या आयुष्याला काही तरी अर्थ द्यायचा आहे. स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे.
पण याच Gen Z मधला एक मोठा वर्ग नकळतपणे वेगळ्याच दिशेने जाताना दिसतोय किंबहुना त्याला ओढलं जातंय .
तो आपल्या करिअरचा, शिक्षणाचा, कौशल्यांचा आणि भविष्यातला विचार करण्याआधी राजकारणाच्या आखाड्यात ओढला जातोय. कुणीतरी त्याला राजकीय विचारांच्या नावाखाली एका गोटात उभं केलं, कुणीतरी दुसऱ्या गोटात नेलं आणि कुणीतरी त्याच्या रागाला, त्याच्या अस्वस्थतेला आणि त्याच्या तरुण रक्ताला आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेताना दिसतंय .
कुणीतरी या तरुणांना उपरोधिकपणे झुरळ म्हटलं.
त्यावर राग व्यक्त करून स्वतःची ओळख निर्माण करण्याऐवजी काही तरुणांनी उलट, “होय, आम्ही झुरळच आहोत,” असं म्हणत तो टोला च आपली ओळख बनवून घेतला. कुणी त्याला काँग्रेसच्या गोटात आणलं, कुणी भाजपाच्या गोटात नेलं, कुणी आणखी कुठल्या राजकीय विचारांच्या गोटात उभं केलं. पण प्रश्न असा आहे की या तिघांपैकी, किंवा कोणत्याही राजकीय गटापैकी, कितीजण या Gen Z ला खरंच त्याच्या करिअरच्या वाटेवर घेऊन जात आहेत ?
राजकारण चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. राजकीय जाणीव असणं गरजेचं आहे. देशात काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणंही गरजेचं आहे. पण राजकीय जाणीव आणि राजकीय वापर यात फरक आहे. हा फरक Gen Z ने आणि अधिकचं त्याच्या पालकांनी समजून घेणं आज सर्वात गरजेचं आहे.
कारण आज एखादा तरुण एखाद्या पक्षासाठी दिवसभर सोशल मीडियावर पोस्ट करतो, विरोधकांना ट्रोल करतो, कमेंटमध्ये भांडतो, नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतो आणि त्याला वाटतं की आपण देशासाठी काहीतरी मोठं काम करतोय. पण त्याच वेळी त्याचा अभ्यास मागे पडतोय का ? त्याचं कौशल्य विकसित होतंय का ? त्याचं करिअर मजबूत होतंय का ? त्याने उराशी बाळगलेल्या ध्येयाच्या दिशेने तो बरोबर चाललाय का ? त्याच्या हातात उद्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही आहे का ? हा प्रश्न त्याने स्वतःला विचारला पाहिजे.
आजचा तरुण जर इंजिनिअर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो, कलाकार होऊ शकतो, खेळाडू होऊ शकतो, संशोधक होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, तर त्याची संपूर्ण ऊर्जा फक्त कोणाच्या राजकीय घोषणांसाठी का खर्च व्हावी ?
राजकारणी आज आहेत, उद्या असतील किंवा नसतील. पक्ष बदलतील, नेते बदलतील, समीकरणं बदलतील. आजचा मित्र उद्या विरोधक होईल आणि आजचा विरोधक उद्या मित्र होईल. राजकारणात हे नवीन नाही. पण तुमचं वय, तुमची तरुणाई, तुमचा अभ्यास, तुमची कौशल्यं आणि तुमच्या आयुष्यातील ही महत्त्वाची उमेदीची वर्षं परत येणार नाहीत.
म्हणून Gen Z ला राजकारणापासून दूर ठेवा असंही नाही. त्यांना राजकारण समजू द्या. पण त्याआधी त्यांना स्वतःला समजून घेऊ द्या. त्यांना त्यांच्या करिअरचा शोध घेऊ द्या. त्यांच्या पॅशनला वेळ देऊ द्या. खेळू द्या, धावू द्या, जिममध्ये घाम गाळू द्या, पुस्तकं वाचू द्या, नवी कौशल्यं शिकू द्या, व्यवसाय सुरू करू द्या, अपयशी होऊ द्या आणि पुन्हा उभं राहू द्या. त्यांना जीवनांतील चढ उतार अनुभवू द्या .
आणि आपण जर पालक असू, त्या Gen Z चे माता-पिता असू, तर एक प्रश्न आपणही स्वतःला विचारला पाहिजे कि आपल्या मुलाला राजकारणासाठी वापरण्याचा नैतिक अधिकार आपण कोणालाही का द्यायचा ? त्याच्या भविष्यासोबत खेळण्याचा अधिकार कोणत्याही पक्षाला, नेत्याला किंवा राजकीय संघटनेला आपण का द्यायचा ?
Gen Z शाळेत असेल तर त्याला शाळेत राहू द्या. कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजमध्ये राहू द्या. एखाद्या करिअरसाठी मेहनत घेत असेल तर त्याला ती मेहनत करू द्या. त्याला स्वतःची वाट शोधू द्या. कारण देशाला फक्त घोषणा देणारी तरुणाई नको आहे.
देशाला देशहितासाठी नव निर्माण करणारी तरुणाई हवी आहे.
काँग्रेस असो, भाजपा असो किंवा कोणताही तिसरा राजकीय गट असो, ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जातील हे येणारा काळ ठरवेल. पण Gen Z ने मात्र स्वतःची दिशा आजच ठरवली पाहिजे.
कारण राजकीय पक्ष बदलता येतात, राजकीय भूमिका बदलता येतात, पण वाया गेलेली तरुणाई परत मिळवता येत नाही.
म्हणून पालकांना माझी विनंती आहे कि कृपा करून आपल्या Gen Z ला कोणाच्याही हातचं बाहुलं बनू देऊ नका. त्याला कोणाच्या राजकीय अजेंड्याची गर्दी बनू देऊ नका. त्याला स्वतःच्या आयुष्याचा नायक बनू द्या. आधी त्याला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. कारण मजबूत करिअर असलेला, विचार करणारा, कौशल्यवान आणि स्वतःच्या पायावर उभा असलेला तरुणच स्वतःसह उद्याचा मजबूत देश घडवू शकतो.
बाकी आपण सुज्ञ आहांत
डॉ दिनेश ललवाणी
राजकीय रणनीतीकार
8432269369